Saturday, November 28, 2020

या तीन गोष्टींशिवाय कोणतीही व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकत नाही


प्रत्येकाची यशस्वी होण्याची रणनीती वेगळी वेगळी असते. वास्तविक कोणाही व्यक्तीची रणनीती त्याच्या आवडीनिवडींवर अवलंबून असते.या सर्व रणनीतींमध्ये असे काही मुद्दे आहेत, ते त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केले पाहिजे. चला,त्या गोष्टी जाणून घेऊया, ज्याशिवाय आपले ध्येय साध्य करणे फार कठीण आहे.

1) आपल्या कामात पारंगत व्हा- आपल्याकडे प्रत्येक क्षेत्राचे थोडेसे ज्ञान असल्यास ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु आपण आपले ध्येय याद्वारे साध्य करू शकत नाही. तुम्हाला एकाद्या क्षेत्रात ध्येय गाठायचे असेल तर त्यात पारंगत असणे फार महत्वाचे आहे.

2) ध्येय निश्चित करा- तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही तरी बनायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करायला हवे.तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट नसाल किंवा तुम्ही त्याबाबत द्विधा मनस्थितीत असाल तर लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करू शकणार नाही.तुमचे लक्ष्य एकाद्या काचेसारखे स्वच्छ,स्पष्ट असायला हवे. जेणेकरून तुम्ही त्यातून आरपार पाहू शकाल.तुम्ही हेदेखील लाखात ठेवा की, हवेत तीर मारल्याने किंवा वारंवार लक्ष्य बदलल्याने तुम्ही तुमच्या यशापासून आणखी दूर होत जाल. महाभारतासारखे आजही यश मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जुनासारखे लक्ष्यावर डोळा ठेवून निशाणा साधावा लागेल. तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकणार आहात.

3) अपयशापासून शिका कौशल्य- जगात असा कोणताही माणूस नाही जो कधीही अयशस्वी झाला नाही. अशा मार्गाने जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी ठरता, तेव्हा त्याचा मनापासून स्वीकार करा आणि त्यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नांमध्ये काय उणीव राहिली आहे, हे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. खरे तर तुम्ही लहान असताना  अडखळता तेव्हाच तुम्ही चालायला शिकता, तसाच यशाचा खरा आनंद प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या अपयशातून शिकता आणि पुढे जाण्याचा आणि यशाच्या जवळ जाण्याचा विचार करता.


Wednesday, November 18, 2020

नकारात्मकतेपासून दूर राहून आपला आत्मविश्वास वाढवा


आपल्यात कायम आत्मविश्वास असावा लागतो. त्याशिवाय तुम्ही हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जात नाही. तुम्ही जे काही काम करत असाल, कोणत्याही व्यवसायात किंवा व्यापारात असाल तर, कार्य योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची आवश्यकता आहे.  आत्मविश्वास हा अगदी आपल्या स्नायूंप्रमाणेच असतो.  जितका जास्त आपण स्नायूंचा वापर कराल तितकी त्यांची ताकद अधिक मजबूत होते.  त्याच प्रकारे एकदा का आत्मविश्वासाने कार्य करत राहिलात की आणखी त्यात वाढतच होत जाते.

खरं तर सुरुवातीला आत्मविश्वास मिळवणे  खूप अवघड असते, परंतु एकदा का तो आपल्याकडे आला की आपण कितीही कठीण, अवघड कार्य  असले तरी सहजपणे  पार पाडू शकतो.  हा आत्मविश्वास आत्मसात करण्यासाठी या खालील  उपायांचा तुम्ही अवलंब करू शकता.

आपली कार्ये पूर्ण करा: आपलं काम करत राहिल्याने आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो आणि या सुरुवातीच्या कार्यापासूनच हळूहळू  कार्य योग्यरित्या पूर्ण करायला वाव मिळतो.  जसजसे,आपण आपली कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यास प्रारंभ करतो, तसतसे आपल्याला आपोआप मानसिक समाधान मिळत जाते. त्यामुळे आत्मविश्वास वाढीला चालना मिळते.

सकारात्मक लोकांसोबत रहा: जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल की, जी तुम्हाला नेहमीच कमी लेखते आणि नेहमीच नकारात्मक बोलते, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा.  जे लोक आपल्याबद्दल सकारात्मक विचार करतात त्यांच्यासोबतच नेहमी रहा.  जर नकारात्मक विचारांची माणसं तशीच कायम वागत राहिली तर  त्यांना तिथेच सोडून तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे.  यामुळे तुमचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढेल.

स्वतःला कमी लेखू नका: बर्‍याचदा आपण स्वतःबद्दल जी धारणा बनवतो, ती आपल्या क्षमतेपेक्षा कमी असते.  असे अजिबात करू नका.  स्वतःला कधीही कमी लेखू नका.  इतर लोक करू शकतात, अशा प्रत्येक गोष्टी तुम्हीही करू शकता.  आपल्यात अनेक क्षमता असतात शिवाय  नसलेल्या बर्‍याच क्षमता  देखील  आपण प्रयत्नाने विकसित करू शकतो.  हा विचार कायम ठेवा,त्यामुळे या विचाराने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

धाडसी बना: आपले कार्य करीत असताना नेहमी निर्भय राहा.धाडस अंगी बानगा.  आपण जर चूकच केली नसेल तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. घाबरल्यामुळे आपण बर्‍याच वेळा आपल्या कामात चूक करतो आणि यामुळे आपला आत्मविश्वास ढळतो.  आत्मविश्वास गमावल्यामुळे कामात चुका होण्याचा धोका  आणखी वाढतो. त्यामुळे निर्भयपणे काम करा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday, November 10, 2020

यशासाठी विवेक आणि सकारात्मकता आवश्यक


प्रथम आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि मग त्या लक्ष्याच्या दिशेने कार्य करण्यास प्रारंभ करायला पाहिजे.  आपले लक्ष्य आवड, सामर्थ्य आणि प्राधान्य यावर आधारित निश्चित करा. तुम्ही तुम्हाला- स्वतःला विचारा, खरेच हे काम आपण करू शकतो का? आपल्याला या  कामात रस आहे का?  आपले प्राधान्य कशाला आहे?  या गोष्टींची उत्तरे मिळवण्यानंतर निर्णय घ्यायला  सोपे जाईल.

बहुतेक करून लोकांना असा विश्वास असतो की, केवळ चांगले शिक्षण आणि कठोर परिश्रम केल्याने यश मिळू शकते.  हे देखील खरे आहे, परंतु जर आपण थोडा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि शहाणपणाने वागलात तर आपण नक्कीच एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता. 

एखादी रणनीती तयार करा: लक्ष्य साध्य करण्यासाठी एखादे धोरण तयार करा.  रणनीती तयार करणे सर्वात महत्वाचे आहे, कारण यावर आधारितच आपल्याला यशाच्या शिखरावर जावे लागेल.  एखादी रणनीती आखताना आपण आपल्या क्षमतेला कमी लेखू नये.

आपला कमकुवत पैलू ओळखा: रणनीती बनवल्यानंतर आपण आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करावा, जे आपल्या यशामध्ये अडथळा ठरू शकतात.  आपल्या उणीवा जाणून घेण्यासाठी आणि वेळेत उणीवा दूर करण्यासाठी मित्र, पालक किंवा शिक्षकांची मदत घ्या.

आपली प्रगती तपासा: रणनीतीनुसार हळूहळू यशाच्या दिशेने जा. आपण ध्येय गाठण्यासाठी तयारी करीत आहात, तीसुद्धा योग्य दिशेने जात आहे का,  याची चौकशी होणे महत्त्वाचे आहे.  जर आपल्याला हे माहित नसेल तर शेवटच्या क्षणांमध्ये आपला वेग कमी होईल.  तर हे टाळण्यासाठी आपली तयारी तपासा किंवा एका विशिष्ट वेळेनंतर वरिष्ठांकडून तपासणी करून घ्या. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतील हे कळेल.

चुकांपासून शिका: जेव्हा आपण आपले कार्य तपासण्यास प्रारंभ करतो, तेव्हा आपल्यासमोर बर्‍याच चुका येऊ लागतील.  या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण चुकांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे.  आपल्याकडून चुका का आणि कोठे होत आहेत, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि त्या संपूर्ण तयारीसह दूर करा.  जर तुम्ही या दिशेने परिश्रमपूर्वक संपूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न कराल तर यश तुमच्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही.  सर्वांत पहिल्यांदा तुम्ही मोठ्या चुका दूर केल्या पाहिजेत. कारण त्या दुरुस्त झाल्याशिवाय लहान लहान चुका आपोआप निघून जाणार नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे



Friday, November 6, 2020

ध्येयपूर्ती हिमखंडासारखी


ध्येय म्हणजे नक्की काय, माझे ध्येय काय आहे, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे. ध्येय ठरवणे, त्यावर काम चालू करणे याबरोबरच ध्येय ठरविण्याआधी काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचदा आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो, त्यासाठी पूर्वतयारीही करतो. कधी प्लॅन अपेक्षेपेक्षा चांगला अमलात आणला जातो तर कधी कमी. ध्येयाचे गणित मात्र  थोडे वेगळे असते.

आपण एक स्वप्न बघतो; ज्यामध्ये आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होताना दिसू लागतात. आपण स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी एक ध्येय ठरवतो. ध्येयाची दिशा ठरली, की आपण मार्ग शोधण्याची प्रक्रिया चालू करतो. प्रत्येक मार्गामध्ये काही प्रगतिदर्शक किंवा मापदंड ठेवतो. उदाहरणार्थ : एक व्यक्ती जेव्हा व्यवसायात उतरायचे ठरवते तेव्हा काही यशस्वी होण्याचे मापदंड ठरवून वाटचाल चालू होते. हे मापदंड पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या  संसाधनाचा (रिसोर्सेस) विचार येतो. काही आपल्याकडे असतात, काही नसतात. बऱ्याचदा संसाधने नाहीत म्हणून ध्येय बदलले जाते किंवा मधूनच सोडून दिले जाते. बऱ्याच अडचणी दिसताच  ध्येय मध्यातूनच सोडून दिले जाते व एक प्रकारची निराशा येते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

1)ध्येयाचा हेतू -आपण याआधी 'का?' या प्रश्नाचे महत्त्व व त्याचे फायदे जाणून घेतले. आपल्या वागण्यामागील किंवा विचारांमागील हेतूबरोबरच आपल्या ध्येयाचाही हेतू जाणून घेणे गरजेचे. आपण जे ध्येय ठरवले आहे, ते आपण का ठरवले आहे, हा पहिला प्रश्न विचारावा. कोणीतरी ठरवले आहे म्हणून, सगळे ठरवतात म्हणून, का मला खरेच काहीतरी बदलायचे आहे म्हणून? हेतू स्पष्ट झाला, की विचारात स्पष्टता येते.

2) ध्येयासाठी लागणारी मानसिकता-ध्येय ठरवताना नकारात्मक किंवा इतरांना दोष देण्याची मानसिकता असेल, तर ध्येयसुद्धा त्याचप्रमाणे तुम्हाला नकारात्मक परिणाम देते. ध्येयासाठी लागणारी योग्य मानसिकता कोणती व ती माझ्याकडे आहे का, हे तपासावे.

3) स्वतःला बदलण्याची तयारी- ध्येय ठरविल्यानंतर स्वतःमध्ये खूप बदल करावे लागतात. काही लोकांना बदल नको असतो; मग तो विचारांचा असला तरीही. स्वतःमध्ये कोणते बदल घडवायला हवेत व त्याची आपली तयारी आहे का, याची स्पष्टता आधीच घ्यावी.

4)आपल्यातील वचनबद्धता- ध्येय ठरवून धरसोड करणे योग्य नाही. आपण आपल्या ध्येयासाठी किती वचनबद्ध आहोत, हे तपासावे. तसेच, त्या वचनबद्धतेसाठी लागणारी मानसिकता व कष्ट करण्याची तयारी आपली आहे का? जरी आत्ता नसली, तरी ही तयारी आपण करू शकतो का, याची स्पष्टता व्यावी.

5)आपल्यातील संयम व सहनशीलता- आज ध्येय ठरविले म्हणजे उद्या लगेच मनाप्रमाणे होणार, असे नाही. मनाप्रमाणे झाले नाही तर आपण कसे प्रतिसाद (रिअॅक्ट) देतो, याचा विचार करा. आपल्यामध्ये संयम व सहनशीलता आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.

ध्येयपूर्ती ही हिमखंडासारखी आहे. वरचे टोक सर्वांना दिसते; पण पाण्याखाली असते ती स्व-जागरूकता, स्व. परिवर्तनासाठी घेतलेले निर्णय, कष्ट व स्वतःमध्ये केलेला बदल.या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.