आपल्यात कायम आत्मविश्वास असावा लागतो. त्याशिवाय तुम्ही हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जात नाही. तुम्ही जे काही काम करत असाल, कोणत्याही व्यवसायात किंवा व्यापारात असाल तर, कार्य योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. आत्मविश्वास हा अगदी आपल्या स्नायूंप्रमाणेच असतो. जितका जास्त आपण स्नायूंचा वापर कराल तितकी त्यांची ताकद अधिक मजबूत होते. त्याच प्रकारे एकदा का आत्मविश्वासाने कार्य करत राहिलात की आणखी त्यात वाढतच होत जाते.
खरं तर सुरुवातीला आत्मविश्वास मिळवणे खूप अवघड असते, परंतु एकदा का तो आपल्याकडे आला की आपण कितीही कठीण, अवघड कार्य असले तरी सहजपणे पार पाडू शकतो. हा आत्मविश्वास आत्मसात करण्यासाठी या खालील उपायांचा तुम्ही अवलंब करू शकता.
आपली कार्ये पूर्ण करा: आपलं काम करत राहिल्याने आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो आणि या सुरुवातीच्या कार्यापासूनच हळूहळू कार्य योग्यरित्या पूर्ण करायला वाव मिळतो. जसजसे,आपण आपली कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यास प्रारंभ करतो, तसतसे आपल्याला आपोआप मानसिक समाधान मिळत जाते. त्यामुळे आत्मविश्वास वाढीला चालना मिळते.
सकारात्मक लोकांसोबत रहा: जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल की, जी तुम्हाला नेहमीच कमी लेखते आणि नेहमीच नकारात्मक बोलते, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा. जे लोक आपल्याबद्दल सकारात्मक विचार करतात त्यांच्यासोबतच नेहमी रहा. जर नकारात्मक विचारांची माणसं तशीच कायम वागत राहिली तर त्यांना तिथेच सोडून तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढेल.
स्वतःला कमी लेखू नका: बर्याचदा आपण स्वतःबद्दल जी धारणा बनवतो, ती आपल्या क्षमतेपेक्षा कमी असते. असे अजिबात करू नका. स्वतःला कधीही कमी लेखू नका. इतर लोक करू शकतात, अशा प्रत्येक गोष्टी तुम्हीही करू शकता. आपल्यात अनेक क्षमता असतात शिवाय नसलेल्या बर्याच क्षमता देखील आपण प्रयत्नाने विकसित करू शकतो. हा विचार कायम ठेवा,त्यामुळे या विचाराने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
धाडसी बना: आपले कार्य करीत असताना नेहमी निर्भय राहा.धाडस अंगी बानगा. आपण जर चूकच केली नसेल तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. घाबरल्यामुळे आपण बर्याच वेळा आपल्या कामात चूक करतो आणि यामुळे आपला आत्मविश्वास ढळतो. आत्मविश्वास गमावल्यामुळे कामात चुका होण्याचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे निर्भयपणे काम करा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment