आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात असे खूप काही क्षण येतात की, आपल्याला पटकन निर्णय घेणं भाग असतं. अशा वेळेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे, याला महत्त्व नसते, निर्णय घेतला जाणं महत्त्वाचं असतं. जर तुम्ही योग्य वेळेला निर्णय घेतला नाहीतर तुम्ही अनेक संधीला मुकाल. यामुळे दोन प्रकारच्या शक्यता आहेत. एक तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुमचा फायदाच होईल आणि दुसरे म्हणजे तुमचा निर्णय चुकला असेल तर तुम्हाला त्यातून एक शिकवण मिळेल, जी तुमच्या पुढच्या निर्णयाला उपयोगाची ठरू शकते. आयुष्य छानपैकी जगायचं असेल तर निर्णय घेण्याची कला आत्मसात केली पाहिजे. यासाठी काही खास प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चुकीचे असणेदेखील बरोबरच
बऱ्याचदा लोकांना निर्णय घेता येत नाही, कारण त्यांना फक्त योग्य निर्णयच हवा असतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण माणूस आहोत आणि माणूस चुकांमधूनच शिकतो. आज जे नवनवीन शोध लागले आहेत, ते एका फटक्यात लागलेले नाहीत. त्यामागे प्रचंड मेहनत आणि जिद्द आहे. या गोष्टी करताना अनेक निर्णय चुकले आहेत. कित्येकदा चुकीमुळे नवीनच शोध लागले आहेत. याचा अर्थ निर्णय चुकला तरी तो वाया जात नाही. त्यामुळे आपल्याला एक धडा मिळून जातो. त्यामुळे निर्णय घेताना खूपच सावधगिरी कामाची नाही,हे लक्षात ठेवा. चुकांची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे चुकीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे,किंवा होणार असते, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार व्हावं लागेल. तुमची मानसिक तयारी होत जाईल.
गोंधळून जाऊ नका
कित्येकदा लोक निर्णय घेण्याअगोदरच त्याच्या परिणामांची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा इतका विचार करत बसतात की, त्यामुळे त्यातच अडकून पडतात. या गोंधळात वेळेत एक छोटादेखील निर्णय घेऊ शकत नाहीत.त्यामुळे त्यांचे दोन प्रकारचे नुकसान होते. एक म्हणजे त्यांच्या डोक्यात एकप्रकारचं द्वंद्व सुरू राहतं आणि दुसरे म्हणजे तुम्ही स्वता :मध्येच अडकून पडल्याने त्याचा फायदा तुमचा विरोधक घेऊन जातो. अनेक विकल्पांवर विचार करून तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवता. त्यामुळे एकादा निर्णयसुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही.
आतला आवाज ऐका
कित्येकदा माणूस स्वतः विषयी आवश्यकतेपेक्षा जास्त विचार करतो. आणि स्वतः मध्येच अडकून पडतो. तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या मदतीने सहज निर्णय घेता आला पाहिजे. बाहेरच्या देखाव्यावर अडकून न पडता आपल्या आतल्या आवाजाला दाबू न ठेवता, तो आवाज ऐका. तुमचा 'आतला आवाज' हा तुमचा खरा आवाज असतो. त्याच्या आधारावर जो काही तुम्ही निर्णय घ्याल, तो कधीच चुकीचा असणार नाही.
डेडलाईन निश्चित करा
नक्कीच महत्त्वपूर्ण निर्णय घेताना फायदा आणि नुकसान या गोष्टींकडे लक्ष द्या, पण ही गोष्ट योग्य नाही की, हे पाहत असताना निर्णयच घेतला न जाणं. यामुळे तुमची योग्य वेळ निघून जाते. यामुळे तुमचा काहीच फायदा होत नाही. नुकसान मात्र होतं. त्यामुळे निर्णय घेताना निर्णयासाठी एक डेड लाईन ठरवा. या डेड लाईनपर्यंत निर्णय अवश्य घेतला जावा, मग तो कसाही असू दे. त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या निर्णयावर अजिबात विचार करत बसायचे नाही. पुढच्या कामाला लागायचे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:
Post a Comment