यशस्वी लोकांच्या जीवनी वाचल्या आणि त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की, यशाच्या शिखरावर पोहचलेल्या लोकांमध्ये काही गोष्टी समान किंवा सवयी समान असतात. आपण आपल्या जीवनात या गोष्टींचा किंवा सवयींचा अंतर्भाव केल्यास तुम्हीही वेगाने प्रगती करू शकता. प्रत्येक दिवसांचा जास्तीत जास्त वेळ कसा सत्कारणी लावावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वेळ वाया घालवणाऱ्या सवयी टाळा- तुम्हाला जर यशस्वी व्यक्ती बनायचं असेल तर दिवसातील मोठा हिस्सा असलेल्या वेळ वाया घालवणाऱ्या सवयींचा शोध घ्यावा. या सवयींचा तपास लागल्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढे जायला ब्रेक लावणाऱ्या या सवयींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करा. पण याची सुरुवात आतापासूनच करा. वेळ दवडू नका. कोणतीही गोष्ट उद्यावर ढकलू नका. प्रयत्नांच्या बळावर मोठ्यात मोठ्या अडचणींवर मात करता येऊ शकते. सततच्या प्रयत्नाने तुमच्या चुकीच्या सवयी हळूहळू कमी होत जातील आणि तुमची यशाच्या दिशेने जाणारी वाटचाल वेग घेईल.
चांगल्यांची संगत धरा-तुम्ही जीवनात यशस्वी होण्याचं ठाणलं असेल आणि यशाच्या एका मुक्कामावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर संगतीचा विचार करावा लागेल. तुमचे विचार कोणाकोणाशी अधिक शेअर करता , तुमचा सर्वाधिक वेळ कोणा कोणासोबत घालवता यावर तुमची विचारसरणी आणि व्यवहार अवलंबून असतात. समजा- तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस अशा लोकांसोबत घालवता ,ज्यांचे विचार छोटे आहेत आणि जे मोठी स्वप्ने पाहायला घाबरतात किंवा ज्यांना जिकडे पाहावे तिकडे नकारात्मकता दिसते.अशांच्या संगतीने तुम्ही कधीच यश मिळवू शकत नाही. कारण त्यांच्या संगतीचा परिणाम तुमच्या विचारावरही पडतो. त्यामुळे जितके लवकर होता होईल तेवढे लवकर अशा नकारात्मक विचारांच्या लोकांची संगत सोडून सकारात्मक विचार बाळगणाऱ्या लोकांच्या मेळ्यात जा. त्यांच्या सोबत उठ-बस ठेवा. याखेरीज तुमच्या स्वप्नांवर आणि विचारांवर हसणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
कामाची टाळाटाळ करू नका- आपल्या संगळ्यांनाच आजचे काम उद्यावर टाकायचे नसते,याची कल्पना आहे. तरीही आपल्यातील कित्येक लोक काम वेळेत पूर्ण करत नाहीत. पण काम उद्यावर टाकल्याने कामांचा बोझा वाढत जातो. आजचे काम आजच पूर्ण करायला हवे. टाळाटाळ केल्याने तुम्ही स्वतःला धोका तर देताच, पण टाळलेले काम कधी ना कधी पूर्ण करावे लागतेच,त्यामुळे त्या कामांचे प्रेशर तुमच्यावर वाढत जाते. मानसिक दबाव वाढत जातो आणि घाईघाईत काम करताना असंख्य चुका होतात व तुमचे वरिष्ठांवर बॅड इम्प्रेशन पडते. त्यामुळे आजचे काम आजच करण्याला प्राधान्य द्या. यश मिळवताना कामावर ठेवलेली निष्ठा आणि मेहनत महत्त्वाची आहे.वेळ दवडणाऱ्या गोष्टी टाळल्यास तुमचे भविष्य 'सुवर्णमय' होणार आहे हे निश्चित!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

