अनेक लोकं स्वतः विषयी तक्रार करत असतात. त्यांना कुठल्याच गोष्टीत एकाग्र होता येत नाही. त्यांचं मन भटकत राहतं. एक गोष्ट मात्र खरी आहे, ती म्हणजे, माणसानं एकाद्या गोष्टीवर एकाग्र होऊन काम केलं की, त्याचं यश निश्चित आहे. एकाग्रतेसाठी माणसाला आपल्या मनाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकाग्रतेसाठी सराव आवश्यक आहे, अभ्यास गरजेचा आहे. यानंतर मात्र मग कुठली समस्या येणार नाही.
कित्येक विद्यार्थ्यांच्याबाबतीत घडतं की, ते पुस्तक उघडून बसतात. काही वेळ वाचतात आणि मग मन भटकायला लागतं. ते विषयाच्याबाबतीत एकाग्र होऊ शकत नाहीत.
असेच सामान्य जीवनात कित्येक लोकांच्याबाबतीत घडतं. ते एका वेळेला अनेक कामं निपटायचं म्हणताहेत. त्यामुळे कोणतंच काम धड चांगल्या प्रकारे होत नाही. माणसाला पुढे जायचं असेल तर एकाग्रतेची कला शिकली पाहिजे. एकाग्र होण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला त्या विषयात आवड निर्माण झाली पाहिजे. तसे झाल्यास मात्र तुम्हाला अधिक विचार करण्याची गरज पडत नाही आणि त्यात मन आपोआप लागतं. याशिवाय आपल्यात जिज्ञासूपणा विकसित व्हायला हवा. जर तुम्हाला वाटतं की, ही सगळी गोष्ट मला येते, तेव्हा तुम्ही त्या विषयाच्या खोलीत जाऊ शकत नाही आणि एकाग्रता भंग पावते. अनेकदा असंही होतं की, माणूस एक काम करायला बसतो पण त्याचवेळेला त्याच्या डोक्यात दुसरीच काळजी किंवा चिंता चाललेली असते. अशा वेळेला डोक्यात भलत्याच कल्पना भराऱ्या मारायला लागतात. आणि साहजिक पुढे जो विषय असतो, त्यापासून मन भटकतं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही कुठल्या एका विषयावर काम करायला सुरुवात करता, त्यावेळेला पहिल्यांदा पूर्णपणे रिलॅक्स व्हा. आणि मगच तुमच्या कामाला सुरुवात करा.
गोंधळलेल्या अवस्थेत कामाला सुरू केल्याने एकाग्रता भंग व्हायला लागते. यानंतर तुम्हाला तुमच्या मनाला देखील मजबूत करावं लागतं. जर तुम्ही वाचन करीत असाल आणि तेव्हा तुम्हाला कुटुंबाची किंवा मित्राची आठवण येत असेल तर तुमच्या अभ्यास होणार नाही. यासाठी तुम्हाला ज्यावेळेला वाटतं की, आपण अभ्यास करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत आणि याशिवाय दुसरे कुठले विचार डोक्यात नाहीत, तेव्हा अभ्यासाला सुरुवात करा. अशा प्रकारे अभ्यास केल्याने तुम्हाला काही वेळातच चांगले परिणाम दिसायला लागतील.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:
Post a Comment