Thursday, August 13, 2020

सुरुवात छोटी करा, पण...

ज्याला लढायचे माहीतच नाही, त्याची जीवनाच्या लढाईत माती झाल्याशिवाय रहात नाही.  छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना वयाच्या आठव्या वर्षी आग्र्याच्या भेटीसाठी बरोबर नेले आणि येताना  मथुरेत ठेवून स्वतः राजगडावर आले . कल्पना करा त्यावेळी संभाजीमहाराज  एकुलते एक पुत्र होते, संपर्काचे कोणतेही साधन नसताना हजारो मैल दूर आपल्या पुत्राला शत्रूच्या मुलखात सोडण्यसाठी किती मोठे धाडस करावे लागले असेल ? औरंगजेबासारख्या वादळाला तोंड द्यायचे असेल तर सरावसुध्दा त्याच तोडीचा अगदी लहानपणापासून करावा लागला आहे .आज जवळपास सगळीच मुले व मुली एकुलत्या एक आहेत, त्यांना संकटाची साधी झळही आपण बसू देत नाही. कदाचित आपण त्यांचे नुकसान करत आहोत, त्यांना पंगु बनवत आहोत. पोटाची भूक माणसाला व्यवहार शिकवते आणि किर्तीची भूक माणसाला झगडणे शिकवते.  अन्नाची चव पदार्थात नसते तर ती भूकेत असते. भूक लागायच्या आधीच अन्न मिळाले तर त्या अन्नाची किंमत कधीच कळत नाही. नेमके तेच आज आपण करत आहोत.किर्तीची भूक निर्माण करावी लागते , त्यासाठी उत्तुंग धेय्य समोर असावे लागते, 

अमाप लोकप्रियता आणि कर्तुत्वाचा हिमालय उभी केलेली माणसे सतत दृष्टीसमोर असावी लागतात.

तरच ही भूक निर्माण होते . आपल्याला पोटापुरते आहे काही काळजी करायचे कारण नाही. ही विचारधारा आत्मविश्वासाने सळसळत्या तारूण्यात झेप घेऊ पाहणाऱ्या तरूणाईच्या पायातील बेडी आहे . ज्या पालकांनी ही बेडी आपल्या मुलांच्या पायात घातली, त्यांना लढणे माहीत होत नाही आणि वादळी संकटात अशी मुले तग धरत नाहीत .शहाजीराजे आणि मॉंसाहेब जिजाऊ यांना काय कमी होते ?  त्यांनी जर शिवरायांच्या पायात  ही बेडी टाकली असती तर काय झाले असते ?  ज्यांनी आपल्या मुलांच्या पायात अशा बेड्या टाकल्या , त्यांना  शिवरायांच्या संरक्षणाची गरज भासली, मॉंसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी ही बेडी तोडली, त्यांच्या पुत्राने इतिहासात सुवर्णपाने लिहायला भाग पाडले.जीवनाची खरी पुंजी ही  झगडण्याची आणि झुंजण्याची कला आहे, तीच वारसाहक्काने मुलांना द्यायला हवी.

आपल्या कुलदीपकाचा प्रकाश हवा असेल तर ही कला म्हणजे त्याच्या चमकण्याचे इंधन आहे, हे कधीच विसरू नका. आज कोणतेच क्षेत्र सुरक्षित नाही ,  तुम्ही कितीही तयारी करून ठेवा , जो झुंजतोय ,लढतोय तोच टिकणार आहे. हात बांधून उभा राहणारा  दुसऱ्याची शिकार होणार आहे . 

मॉंसाहेब जिजाऊ शिवरायांना आशिर्वाद देताना दररोज म्हणायच्या, राजे दौलत चढती करा ! हे झगडायला शिकवणे आहे. चारशे वर्षापूर्वी त्या मातेला कळाले होते, बापाच्या कमाईवर जगणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही . आजही आम्हाला हे समजलेले नाही, मुले लग्नाला आली तरी आम्ही त्यांची काळजी करत आहोत आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे त्यांची काळजी घेत आहोत.

     स्वतःला आवडणारा रस्ता निवडा,मार्ग निश्चित करा.ध्येय निश्चित करा.मग हा निवडलेला रस्ताच जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले कोणी सोबत असो वा नसो.फक्त चालण्यात सातत्य हवे. सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे,आयुष्यात  सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना अस चालायचं की आपल्या कर्तृत्वाची,आणि  मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदिप्यमान यशाची सोन पावले सदैव  मागे उमटली पाहिजे. (संकलन)

No comments:

Post a Comment