Monday, April 12, 2021

चूक हाच यशाचा आधार


आपण आपल्या आयुष्यात कित्येक प्रकारच्या चुका करत असतो. पण चुका काही इतक्या वाईट नसतात की, जितके आपण त्यांना वाईट बनवतो. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतात. आपण जर सकारात्मक पैलूकडेही लक्ष दिलं तर आपल्याला नकारात्मकतेमध्येदेखील कुठे ना कुठे आशेचे किरण दिसू लागतात. चुकीचा सकारात्मक पैलू हा आहे की चूकच आपल्या यशाचा वास्तविक आधार आहे. ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटत असली तरी हेच कटूसत्य आहे. वास्तविक चूक करणं किंवा होणं ही एक स्वाभाविक आणि प्राकृतिक प्रक्रिया आहे. आपल्या घर-परिवारात, समाजात आणि कार्यालयात चूक करणाऱ्याकडे संशयाने पाहिले जाते. कधी त्याचा उपहास केला जातो तर कधी त्याला 'चेष्टे'चा विषय बनवला जातो. त्याचमुळे चुका करणारी व्यक्ती स्वतःलादेखील संशयाने पाहायला लागते. कधी कधी त्याला अपराधीपणाची जाणीव होते. 

जेव्हा आपण एकाद्या चुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी अतिरिक्त काळजी घेतो ,तेव्हा चूक होण्याची शक्यता आणखी जास्त वाढते. अतिरिक्त काळजी घेताना आपलं मस्तिष्क नॉर्मल राहत नाही. नॉर्मल मस्तिष्कच सहज रूपाने शारीरिक गतीशीलतेला अंजाम  देतो. नॉर्मल मस्तिष्क नॉर्मल न राहिल्याने आपल्या शारीरिक क्रियाकल्पांवर परिणाम होतो. अशाप्रकारे आपण एका चुकीच्या दिशेने जायला लागतो. त्यामुळे चूक करणाऱ्या व्यक्तीला फक्त रागावून, बोलून किंवा भीती घालून सुधारू शकत नाही.जर चूक करणाऱ्या माणसांत भीती बसली तर तो पुन्हा पुन्हा चुका करत राहील. आपले हे कर्तव्य आहे की, पुन्हा पुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 'नॉर्मल मोड'वर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय योजायला हवेत.

तुम्ही सहकारी असाल तर तुमचं कर्तव्य आहे की त्याच्या चुकीला मोठं करून लोकांसमोर न मांडणं. जर माणूस काम करत असेल तर मग चूकही होणारच ना! काहीही काम न करणारा किंवा रिकामा राहणारा माणूस चूक कशी करेल बरं? त्यामुळे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की, चुकांमधूनच प्रगतीचा मार्ग निघत असतो. काही लोक यासाठी नवीन काम करायला धजावत नाहीत, कारण त्याच्या हातून चूक होईल की काय,याची भीती असते. अशी माणसं सदा पुढे जायला घाबरतात आणि मागच्या रांगेतला माणूस बनून राहतात. जगात जितकीही माणसं मोठी किंवा बनली ,त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. चुकांच्या माध्यमातूनच  ते महानतेच्या दिशेने अग्रेसर राहिले. शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोगशाळेत प्रयोग करत असतात,तेव्हा त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. याच चुका त्यांच्या प्रयोगाच्या यशाचा आधार बनतात.त्यामुळे चुकांना जीवनाचा भाग समजून आणि त्यातून धडा घेऊन पुढे जाण्यातच भलं आहे. जैन धर्मात तर आपल्या चुका स्वीकारून क्षमा मागण्यांसाठी क्षमावाणी पर्व साजरे केले जाते.या दिवशी जगातल्या सर्व प्राण्यांकडून झालेल्या चुकांसाठी क्षमा याचना करून सर्वांच्या आनंदासाठी कामना केली जाते.जेव्हा आपण आपल्या चुकीसाठी क्षमा मागतो तेव्हा आपल्याला आत्मानंद मिळतो. त्यामुळे आपले मन हलके होते. अशा प्रकारे माफी मागितल्याने आपले ओझेही कमी होते.

खरं तर जेव्हा आपण आपली चूक स्वीकारतो,तेव्हा त्याचा अर्थ होतो की, आपण आपली सर्व शस्त्रे टाकून कळत नकळत केलेल्या चुकीच्या कामाला स्वतः देखील चुकीचं मानतो. त्यामुळे इथे आणखी एक मानसिक दडपण कमी होतं. दुसऱ्या बाजूला आपण सन्मानास पात्रही ठरतो. जेव्हा आपण मनापासून चूक स्वीकार करतो,तेव्हा पुन्हा चूक होण्याची शक्यता कमी होऊन जाते.आपण पुन्हा चूक तेव्हाच करतो,जेव्हा आपण पहिल्या चुकीबाबत एक तर विचार करत नाही किंवा फार मनावर घेत नाही.

जेव्हा आपण आपली चूक स्वीकार करतो,तेव्हा मनापासून त्याचा विचार करतो. चुकीबाबत मनापासून विचार केल्याने आपल्याला त्यातही सकारात्मकता दिसते. म्हणजे चूकच आपल्याला आपल्या यशाचा आधार दाखवते. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा चुका करत राहतो, तेव्हा चुका करण्याची आपली सवय होऊन जाते. आणि ही सवय एकदा फळांसारखी पिकली की, आपण स्वतः तर दुःखी होऊच पण दुसऱ्यांना आपण दुःख देतो.म्हणून पुन्हा पुन्हा चुका करण्याची सवय टाळूया आणि एक दोन चुकांनंतर आत्मचिंतन करूया.आत्मचिंतनच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल.-रोहित कौशिक अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, March 27, 2021

वेळ दवडणाऱ्या सवयी टाळा


यशस्वी लोकांच्या जीवनी वाचल्या आणि त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की, यशाच्या शिखरावर पोहचलेल्या लोकांमध्ये काही गोष्टी समान किंवा सवयी समान असतात. आपण आपल्या जीवनात या गोष्टींचा किंवा सवयींचा अंतर्भाव केल्यास तुम्हीही वेगाने प्रगती करू शकता. प्रत्येक दिवसांचा जास्तीत जास्त वेळ कसा सत्कारणी लावावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वेळ वाया घालवणाऱ्या सवयी टाळा- तुम्हाला जर यशस्वी व्यक्ती बनायचं असेल तर दिवसातील मोठा हिस्सा असलेल्या वेळ वाया घालवणाऱ्या सवयींचा शोध घ्यावा. या सवयींचा तपास लागल्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढे जायला ब्रेक लावणाऱ्या या सवयींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करा. पण याची सुरुवात आतापासूनच करा. वेळ दवडू नका. कोणतीही गोष्ट उद्यावर ढकलू नका. प्रयत्नांच्या बळावर मोठ्यात मोठ्या अडचणींवर मात करता येऊ शकते. सततच्या प्रयत्नाने तुमच्या चुकीच्या सवयी हळूहळू कमी होत जातील आणि तुमची  यशाच्या दिशेने जाणारी वाटचाल  वेग घेईल.

चांगल्यांची संगत धरा-तुम्ही जीवनात यशस्वी होण्याचं ठाणलं असेल आणि यशाच्या एका मुक्कामावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर संगतीचा विचार करावा लागेल. तुमचे विचार कोणाकोणाशी अधिक शेअर करता , तुमचा सर्वाधिक वेळ कोणा कोणासोबत घालवता यावर तुमची विचारसरणी आणि व्यवहार अवलंबून असतात. समजा- तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस अशा लोकांसोबत घालवता ,ज्यांचे विचार छोटे आहेत आणि जे मोठी स्वप्ने पाहायला घाबरतात किंवा ज्यांना जिकडे पाहावे तिकडे नकारात्मकता दिसते.अशांच्या संगतीने तुम्ही कधीच यश मिळवू शकत नाही. कारण त्यांच्या संगतीचा परिणाम तुमच्या विचारावरही पडतो. त्यामुळे जितके लवकर होता होईल तेवढे लवकर अशा नकारात्मक विचारांच्या लोकांची संगत सोडून सकारात्मक विचार बाळगणाऱ्या लोकांच्या मेळ्यात जा. त्यांच्या सोबत उठ-बस ठेवा. याखेरीज तुमच्या स्वप्नांवर आणि विचारांवर हसणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

कामाची टाळाटाळ करू नका- आपल्या संगळ्यांनाच आजचे काम उद्यावर टाकायचे नसते,याची कल्पना आहे. तरीही आपल्यातील कित्येक लोक काम वेळेत पूर्ण करत नाहीत. पण काम उद्यावर टाकल्याने कामांचा बोझा वाढत जातो. आजचे काम आजच पूर्ण करायला हवे. टाळाटाळ केल्याने तुम्ही स्वतःला धोका तर देताच, पण टाळलेले काम कधी ना कधी पूर्ण करावे लागतेच,त्यामुळे त्या कामांचे प्रेशर तुमच्यावर वाढत जाते. मानसिक दबाव वाढत जातो आणि घाईघाईत काम करताना असंख्य चुका होतात व तुमचे वरिष्ठांवर बॅड इम्प्रेशन पडते. त्यामुळे आजचे काम आजच करण्याला प्राधान्य द्या. यश मिळवताना कामावर ठेवलेली निष्ठा आणि मेहनत महत्त्वाची आहे.वेळ दवडणाऱ्या गोष्टी टाळल्यास तुमचे भविष्य 'सुवर्णमय' होणार आहे हे निश्चित!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday, March 11, 2021

जे लोक नेहमी आनंदी असतात त्यांना काही खास सवयी असतात


जगात असे बरेच लोक आहेत जे तणावमुक्त राहून प्रत्येक परिस्थितीत आनंदाने जगतात.  आयुष्यात सुख आणि दु: ख येते, परंतु जे लोक नेहमी आनंदी असतात ते सहसा व्यर्थ गोष्टीची चिंता करत नाहीत आणि हसत हसत जीवन जगत असतात आणि आनंदी राहतात.  वास्तविक, या लोकांना काही सवयी आहेत ज्या त्यांना प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ठेवतात आणि तणावग्रस्त परिस्थितीतही त्यांचा ताण येत नाही.

चांगले शोधतात, वाईट नाही: साहजिकच माणसाचा कल नकारात्मक गोष्टींकडे अधिक असतो.  बहुतेक लोक इतरांच्या उणीवाकडे अधिक लक्ष देतात आणि चांगल्कययाडे कमी.  त्याच वेळी, नेहमी आनंदी लोक प्रत्येक परिस्थितीत चांगल्या आणि चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात.  या लोकांना असा विश्वास आहे की जे घडते ते चांगल्यासाठी आहे.  त्यामुळे ते बहुतेक आनंदी असतात.

माफ करणं जाणतात: जे लोक नेहमी आनंदी असतात.  इतरांसह स्वतःला कसे क्षमा करावे हे त्यांना माहित आहे. ते लोक छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेत नसतात. ते लोक माफी मागण्यातही कंजूषी करत नाहीत.  जर त्यांनी कधीही चूक केली तर ते स्वत: दिलगीरी व्यक्त करतात. यामुळे त्यांच्या हृदयातून चुका करण्याचं ओझं कमी होते आणि ते आनंदी राहतात.

मनापासून काम करतात : लोकांना नेहमी आनंदी ठेवण्याचे गुण म्हणजे ते त्यांचे कार्य मनापासून करतात.  कधीकधी त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात जे त्यांच्या आवडीच्या नाहीत.  तरीही, ते कामापासून चोरी करीत नाहीत आणि परिश्रमपूर्वक काम करतात आणि आनंदित असतात.

आपले काम मोठ्या उद्देशाशी जोडून पाहतात: जे लोक नेहमी आनंदी असतात ते आपले काम मोठ्या उद्देशाला जोडून पाहतात.  काही मजूर मंदिराच्या बांधकामात मजुरी करत असतात.  एका मजुराचं म्हणणं होतं की, होता की तो भिंत बांधत आहे.  दुसर्‍याचं म्हणणं होतं की, तो विटा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेत होता.  त्याचवेळी तिसर्‍या कामगाराने सांगितले की तो मंदिर बांधणीत आपले श्रम दान करीत आहे.  आता तुमच्या लक्षात येईल की कोण आनंदी आहे. या तीन मजुरांपैकी सर्वात आनंदी तिसरा मजूर असेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली