आपण आपल्या आयुष्यात कित्येक प्रकारच्या चुका करत असतो. पण चुका काही इतक्या वाईट नसतात की, जितके आपण त्यांना वाईट बनवतो. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतात. आपण जर सकारात्मक पैलूकडेही लक्ष दिलं तर आपल्याला नकारात्मकतेमध्येदेखील कुठे ना कुठे आशेचे किरण दिसू लागतात. चुकीचा सकारात्मक पैलू हा आहे की चूकच आपल्या यशाचा वास्तविक आधार आहे. ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटत असली तरी हेच कटूसत्य आहे. वास्तविक चूक करणं किंवा होणं ही एक स्वाभाविक आणि प्राकृतिक प्रक्रिया आहे. आपल्या घर-परिवारात, समाजात आणि कार्यालयात चूक करणाऱ्याकडे संशयाने पाहिले जाते. कधी त्याचा उपहास केला जातो तर कधी त्याला 'चेष्टे'चा विषय बनवला जातो. त्याचमुळे चुका करणारी व्यक्ती स्वतःलादेखील संशयाने पाहायला लागते. कधी कधी त्याला अपराधीपणाची जाणीव होते.
जेव्हा आपण एकाद्या चुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी अतिरिक्त काळजी घेतो ,तेव्हा चूक होण्याची शक्यता आणखी जास्त वाढते. अतिरिक्त काळजी घेताना आपलं मस्तिष्क नॉर्मल राहत नाही. नॉर्मल मस्तिष्कच सहज रूपाने शारीरिक गतीशीलतेला अंजाम देतो. नॉर्मल मस्तिष्क नॉर्मल न राहिल्याने आपल्या शारीरिक क्रियाकल्पांवर परिणाम होतो. अशाप्रकारे आपण एका चुकीच्या दिशेने जायला लागतो. त्यामुळे चूक करणाऱ्या व्यक्तीला फक्त रागावून, बोलून किंवा भीती घालून सुधारू शकत नाही.जर चूक करणाऱ्या माणसांत भीती बसली तर तो पुन्हा पुन्हा चुका करत राहील. आपले हे कर्तव्य आहे की, पुन्हा पुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 'नॉर्मल मोड'वर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय योजायला हवेत.
तुम्ही सहकारी असाल तर तुमचं कर्तव्य आहे की त्याच्या चुकीला मोठं करून लोकांसमोर न मांडणं. जर माणूस काम करत असेल तर मग चूकही होणारच ना! काहीही काम न करणारा किंवा रिकामा राहणारा माणूस चूक कशी करेल बरं? त्यामुळे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की, चुकांमधूनच प्रगतीचा मार्ग निघत असतो. काही लोक यासाठी नवीन काम करायला धजावत नाहीत, कारण त्याच्या हातून चूक होईल की काय,याची भीती असते. अशी माणसं सदा पुढे जायला घाबरतात आणि मागच्या रांगेतला माणूस बनून राहतात. जगात जितकीही माणसं मोठी किंवा बनली ,त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. चुकांच्या माध्यमातूनच ते महानतेच्या दिशेने अग्रेसर राहिले. शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोगशाळेत प्रयोग करत असतात,तेव्हा त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. याच चुका त्यांच्या प्रयोगाच्या यशाचा आधार बनतात.त्यामुळे चुकांना जीवनाचा भाग समजून आणि त्यातून धडा घेऊन पुढे जाण्यातच भलं आहे. जैन धर्मात तर आपल्या चुका स्वीकारून क्षमा मागण्यांसाठी क्षमावाणी पर्व साजरे केले जाते.या दिवशी जगातल्या सर्व प्राण्यांकडून झालेल्या चुकांसाठी क्षमा याचना करून सर्वांच्या आनंदासाठी कामना केली जाते.जेव्हा आपण आपल्या चुकीसाठी क्षमा मागतो तेव्हा आपल्याला आत्मानंद मिळतो. त्यामुळे आपले मन हलके होते. अशा प्रकारे माफी मागितल्याने आपले ओझेही कमी होते.
खरं तर जेव्हा आपण आपली चूक स्वीकारतो,तेव्हा त्याचा अर्थ होतो की, आपण आपली सर्व शस्त्रे टाकून कळत नकळत केलेल्या चुकीच्या कामाला स्वतः देखील चुकीचं मानतो. त्यामुळे इथे आणखी एक मानसिक दडपण कमी होतं. दुसऱ्या बाजूला आपण सन्मानास पात्रही ठरतो. जेव्हा आपण मनापासून चूक स्वीकार करतो,तेव्हा पुन्हा चूक होण्याची शक्यता कमी होऊन जाते.आपण पुन्हा चूक तेव्हाच करतो,जेव्हा आपण पहिल्या चुकीबाबत एक तर विचार करत नाही किंवा फार मनावर घेत नाही.
जेव्हा आपण आपली चूक स्वीकार करतो,तेव्हा मनापासून त्याचा विचार करतो. चुकीबाबत मनापासून विचार केल्याने आपल्याला त्यातही सकारात्मकता दिसते. म्हणजे चूकच आपल्याला आपल्या यशाचा आधार दाखवते. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा चुका करत राहतो, तेव्हा चुका करण्याची आपली सवय होऊन जाते. आणि ही सवय एकदा फळांसारखी पिकली की, आपण स्वतः तर दुःखी होऊच पण दुसऱ्यांना आपण दुःख देतो.म्हणून पुन्हा पुन्हा चुका करण्याची सवय टाळूया आणि एक दोन चुकांनंतर आत्मचिंतन करूया.आत्मचिंतनच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल.-रोहित कौशिक अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment