Monday, July 6, 2020

रागावर ताबा ठेवा

'राग हा माणसाचा शत्रू आहे' हा सुविचार आपण अगदी
लहानपणापासून शाळेत फळ्यावर लिहीत आलेलो आहोत. हा शत्रू सगळ्यात जास्त नुकसान करणारा असतो, हे ही आपल्याला माहीत असते. कुठल्याही मोठ्या आर्थिक नुकसानापेक्षा, या रागामुळेच अनेक नाती, अनेक संबंध अगदी कायमचे नष्ट होतात. अविचाराच्या हातात हात घालून येणारा हा शत्रू माणसाची सद्सद विवेक बुद्धी गहाण ठेवण्यास भाग
पाडतो. मनासह शरीरावरही वाईट परिणाम करणारा हा राग का येतो माणसाला इतका? 'कळतं पण वळत नाही' असेही घडते, पण राग काही शांत होत नाही माणसाचा. अपयश, काही गोष्टी कारणीभूत असतात

हा न दिसणारा शत्रू निर्माण होण्यासाठी. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, सततचे सतत होणारा अपमान आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला साथ न देणारे आपले नशीब. अनेकजण म्हणतीलही की, आपले नशीब आपणच घडवायचे असते, पण हातावरील रेषाही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
अचानक येणारा वा अगदी स्वाभाविक असणारा हा राग आपण कसा हाताळतो किंवा काबूत आणतो हेही आपल्याच हातात असते. अनेक वेळा या रागामुळे आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचे व्यक्त होतो, अपशब्द बोलतो, हमरातुमरीवर येऊन रागाच्या भरात समोर कोण आहे, हे विसरून परिस्थिती हातातून घालवण्यास कारणीभूत ठरतो. याचा परिणाम अगदी खोल होतो, हेही आपल्याला कळत नाही.
राग निवळल्यावर कळते की आपण चुकलो! पण धनुष्यातून सोडलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. तलवारीसारखे मनावर घाव करणारे शब्द रागाच्या भरात एखाद्याकडून उच्चारले गेले तर ते घाव कधीही न भरण्यासारखे असतात. मग हे टाळण्यासाठी, ही नाती तुटू नयेत म्हणून आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा असतो संयम आणि तो राखणे असते सगळ्यात कठीण. दोन किंवा अधिक वेगवेगळ्या स्वभावाची माणसे एकत्र राहतात, नात्यात गुंफली जातात तर कधीतरी भांड्याला भांडे लागतेच, किंवा थोडेफार वाद होतातच. पण यातून मने तुटणे, नाती दुभंगणे, असे होऊन नये म्हणून आपणच प्रयत्न करायचे असतात.

No comments:

Post a Comment