Monday, July 13, 2020

इतरांपेक्षा वेगळे करा

तुमच्या भविष्याविषयी बोलण्याआधी मला काही काळ भूतकाळात डोकवायला आवडेल. १९१८ च्या प्रारंभी नौदलात सहाय्यक सचिव असणारा ३६ वर्षांचा तरुण परदेशी निघाला होता. युरोपियन युद्धासाठी अमेरिकेच्या नवख्या सैनिकांना सज्ज करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती. दुसरीकडे अवघ्या ३0 वर्षांचा, शोधप्रबंध सादर करण्याची स्वप्नं रंगवणारा, युद्धामुळे चिरडला गेलेला सुधारणावादी कवी- अध्यापक स्वत:मध्ये दंग होता. पण शिक्षक आणि बँकेतला कर्मचारी अशा दोन परस्परविरोधी नोकर्‍यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न तो करत होता.
तिसरीकडे २0 वर्षांची एक परिचारिका टोरांटोमधल्या लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांची शुर्शुषा करत होती. तची ही शुर्शुषा सुरू असतानाच विचित्र आजाराने तोंड वर काढल्यामुळे तिच्या कामाचे तासही बरेच वाढले. देश, समाज आणि शरीरांना स्पॅनिश फ्लूने वळख्यात घेईपर्यंत या तिघांमध्ये कायमस्वरुपी बदल घडला होता. फ्रँकलिन डलॅनो रूझवेल्ट यांना नौदलाच्या जहाजातून स्ट्रेचरने बाहेर आणण्यात आलं. दुखण्यातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यांनी देशाच्या राजकारणात पाऊल टाकलं. त्यांचं हे पाऊल इतिहास घडवणार होतं. आजारी टी. एस. इलयॉट यांनी बिछान्यावरच कविता लिहायला सुरूवात केली. त्यातूनच 'द वेस्ट लँड' या त्यांच्या सर्वोत्तम काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. 'एप्रिल इज द क्रूएलेस्ट मंथ' ही या काव्यसंग्रहातली पहिली कवता. इथूनच आधुनिक साहित्याची चळवळ सुरू झाली. या काव्यसंग्रहाने त्यांना अत्यंत मानाचं, साहित्यातलं नोबेल पारितोषक मिळवून दिलं. अँमेलिया एअरहार्टला एका रुग्णाच्या संपर्कात आल्याने फ्लूची लागण झाली. हा फ्लू बरा व्हायला बराच वेळ लागला, बरीच गुंतागुंत निर्माण झाली. तिचा हा अनुभव बराच वेदनादायी होता. विलगीकरण आणि सामाजिक दुराव्याचा अत्यंत कंटाळवाणा काळ तिने आकाशातली विमानं बघण्यात घालवला. यानंतर आयुष्याला, कारकिर्दीला कलाटणी देण्याचे विचार तिच्या मनात डोकावू लागले.
पदवीधर विद्यार्थ्यांनो, आजचा हा क्षण आपण एकत्र साजरा करत नसल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा पदवीधरांची बॅच विशेष आहे. ओहयो विद्यापीठाच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात अशा अनेक बॅचेसचं नाव नोंदलं गेलं. तुमच्या बॅचलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. आज आपण खांद्याला खांदे लावून उभे नसलो तरी तुमचे पालक, प्रियजन, शिक्षक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांनाच तुमच्याबद्दल आणि तुमच्या या यशाबद्दल अभिमान वाटत असणार, हे मी खात्रीने सांगू शकतो. फ्रेमच्या आत राहून संपूर्ण छायाचित्रं बघणं खूप कठीण असतं. मात्र सध्याच्या या विपरित परिस्थितीत तुम्ही डगमगणार नाही. उलट, ही परिस्थिती छातीवरच्या एखाद्या बिल्ल्याप्रमाणे अभिमानाने मिरवाल, अशी मला आशा आहे. डोळे आणि मनाची कवाडं उघडी ठेऊन इतिहासात नोंद घेण्याजोग्या आव्हानांचा सामना करणारे, सतत अस्वस्थ, प्रयत्नशील असणारे इतरांच्या आयुष्यावर जबरदस्त प्रभाव टाकतात, मोठी छाप सोडून जातात. आपल्या आयुष्याची कथा आपण एकटेच लिहित नाही याची जाणीव आयुष्य वयाच्या प्रत्येक टप्प्यावर करून देत असतं. खूप वैतागवाण्या पद्धतीने आपल्याला याची जाणीव होत असते. आपल्याला आवडो अथवा न आवडो, अत्यंत अवघड आणि स्वार्थी अशा 'परिस्थिती' नामक सहकार्‍याला याचं श्रेय द्यावंच लागतं. भविष्यासाठी अत्यंत उत्साहाने आखलेल्या आपल्या योजनांचा बट्टयाबोळ झाल्यानंतर (तो नेहमी होणारच असतो), आपल्या आशा-आकांक्षांचा चुराडा झाल्यानंतर (कधी तरी असं होऊ शकतं) आपल्याकडे दोनच पर्याय उरतात. आयुष्यात कधीही न घडू शकणार्‍या गोष्टी गमावल्याबद्दल दु:ख करत राहणं, स्वत:ला दोष देत राहणं किंवा आयुष्याचं कथानक लिहित असताना अचानक झालेल्या बदलांबाबत आभार व्यक्त करण्याची कारणं शोधणं..
१९९८ मध्ये 'अँपल'मध्ये रूजू झाल्यानंतर माझा माझ्या नशिबावर विश्‍वासच बसत नव्हता. उर्वरित व्यावसायिक कारकिर्द मी स्टीव्ह जॉब्स यांच्यासाठी काम करण्यात घालवणार होतो. पण नशिबात काही तरी वेगळंच लिहिलं होतं. आपलं प्राक्तन चोरपावलांनी आत शिरत असतं. स्टीव्ह यांच्या निधनानंतर मला प्रचंड एकटेपणा जाणवला. इतरांवरचा आपला प्रभावच शाश्‍वत आणि सर्वात शक्तीशाली असतो, याचाच हा पुरावा म्हटला पाहिजे. या क्षणी मागे वळून पाहताना आपल्यातल्या काहींना गैरसोयी, अडचणी अगदी कंटाळवाणा काळ आठवत असेल. अशांनी स्वत:ला नशीबवान समजायला हवं. यातूनच बर्‍याचजणांना आयुष्यातला खरा संघर्ष, भय यांची ओळख होईल. इतरांना आयुष्यात काही गोष्टी गमवाव्या लागतील.
आयुष्याच्या या टप्प्यावर मन हलकं करण्यासाठी आपण प्रियजन किंवा मित्रमैत्रिणींकडे जाऊ. मात्र त्यावेळी तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्तींना आठवा. या व्यक्ती लांबच्या असल्या तरी त्यांच्या प्रभावाचं महत्त्व तसूभरही कमी होत नाही. तुम्ही अनोळखी वडिलांचा विचार करा. दुर्लक्षित आणि समाजाचा तिरस्कार झेलणारे हे वडिल त्यांच्या आणि तुमच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सर्व धोके पत्करून आजही शेतात राबत आहेत. रात्री राबणार्‍या आणि सकाळी सार्वजनिक बस चालवणार्‍या एकल पालकत्वाचं ओझं वाहणार्‍या आईचा विचार करा. रुग्णालयातल्या अखंड रुग्णसेवेचा विचार करा. रुग्णालयातली प्रत्येक खोली स्वच्छ करणार्‍या कर्मचार्‍यांचा विचार करा.
त्यांचं काम मंदिराची स्वच्छता करणार्‍या पुजार्‍याच्या कामाइतकंच पवित्र आहे. आता उत्तम दर्जाचं शिक्षण मिळविणारे तुम्ही अशा परिस्थितीत कोणती कृती कराल, कसं काम कराल, इतरांपेक्षा वेगळे कसे ठराल याचा विचार करा. या काळातल्या स्मृती मनात जपून ठेवा. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं हे आपल्याला या काळाने शिकवलं आहे.

No comments:

Post a Comment