'ययाति' ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. इ.स. १९७२ साली वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मराठीतला अत्यंत अमुल्य ठेवा. प्रेम म्हणजे नक्की काय हे याचे नितांत सुंदर वर्णन आहे. शर्मिष्ठेचे निष्पाप प्रेम अप्रतिम आहे. मानवाच्या मनातील भौतिक सुखांच्या ओढीचे प्रतिक म्हणजेच ययाती. ययाती, देवयानी, शर्मिष्ठा ह्यांन च मनोगत वाचतांना आपण खरच गुंग होऊन जातो , त्या पात्रात हरवून जातो.
ययातीतीची काही सुंदर वाक्य आहेत ते येथे देत आहे.
● या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे, तसं मरणाचं नाही...
मृत्यु अनेक वाटांनी येतो! कुठून ही येतो तो!
●आत्मप्रेम... या जगात जो तो आपापल्याकारिता जगतो हेच खरे.
वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात.....
●याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री........पण खरोखरच हे आत्मप्रेम असते....
आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे,
असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.........
●अपहार...
ते फूल पाहून माझ्या डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे.
ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी.
पण ते तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी वाटतील मला.
मग दूस-यांच्या फूलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल........
अपहारासारखा अधर्म नाही..........
●सत्य...
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते.
नुकत्याच जन्मलेल्या बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते..........
●सुख...
या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो-----ते मिळत असते तेव्हा.......!
●प्रिती...
प्रिती ही कधी उमलणा-या फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते.
ती कधी चांदणी होते, तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे... ती कधी जीव देते, तर कधी जीव घेते.........!!
●जीवन...
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे..
●प्रेम..
प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो,
ते कशावरही जड़लेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा नये.
●खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं, निरपेक्ष असतं... मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो,
प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष,
निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते...........
असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो!
● जग माणसाच्या दयेवर चालत नाही.
● ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं.
माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.
● मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी ! !
त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.
● मुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ?
● फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.
● दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो.
● लज्जा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.
● माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे.
★ खांडेकर यांना ययाती आणि त्यांच्या रूपक कथेच्या पलीकडे पाहिलं पाहिजे.वि.स खांडेकर हे खरोखरच एक मराठीचे महान लेखक होते म्हणूनच त्यांच्या साहित्याला प्रदेश आणि प्रांत आणि भाषेची सिमा बंधन नव्हत ते साहित्य भारतात, परदेशात ही वाचलं गेलं.
म्हणून त्यांचं साहित्य केवळ मराठीत वाचलं जात नाही, तर समग्र भारतीय भाषांत त्याची भाषांतरे आढळतात. सिंधी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम्, तामिळ, गुजराती, हिंदी, इंग्रजी किती भाषा सांगाव्या, त्यांचं साहित्य भारतभर वाचलं जातं. अभ्यासल जात विशेष म्हणजे, त्या भाषेतही भाषांतरांच्या आवृत्त्या आजही प्रकाशित होतात. तामिळ, गुजरातीत तर खांडेकर यांच्या भाषेतील लेखक मानले जातात. तामिळ व मराठी वाचकांचा कौल घेतला तर तामिळ भाषिक मतं खांडेकरांना अधिक मिळतील.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराय यांना खांडेकरांच्या कादंबऱ्याचें उतारेच्या उतारे पाठ होते. त्यांच्या ‘द्रविड कळघम’, ‘द्रविड मुनेत्र कळघम’ पक्षाची चळवळ खांडेकर विचारांवर उभी राहिली आहे. तामिळ साहित्य इतिहासात ‘खांडेकर साहित्य’ अध्याय म्हणून अभ्यासलं जातं. खांडेकरांचे तामिळ अनुवादक कां. श्री. श्रीनिवासाचार्य तर तामिळमध्ये लेखक म्हणून ओळखले जातात, ते केवळ खांडेकरांच्या भाषांतरामुळे. श्रीलंका, मलेशिया, रशियामध्ये खांडेकर साहित्यावर संशोधन, समीक्षा आहे. रशियात ‘ययाति’ भाषांतरित झाली आहे. देश, प्रदेशाच्या सीमा ओलांडणारं खांडेकरी साहित्य खरोखर अजरामर आहे. पिढ्या घडविण्याचे कार्य करणा-या मोजक्या साहित्यिकांत वि. स. खांडेकरांचा समावेश होतो, तो या योगदानामुळे. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण, महाभारत, पंचतंत्र, पुराण इत्यादींमधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही, तर त्याचा समकालीन परिस्थितीशी समन्वय लावून त्याचा नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय.

No comments:
Post a Comment