Tuesday, September 8, 2020

इमॅजिनेशनसोबत हवं नॉलेज


तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त तुमच्याकडे नॉलेज असून चालणार नाही. यशस्वी होण्यासाठी व्यक्तीजवळ इमॅजिन करण्याची क्षमताही असावी लागते. जर तुमच्याजवळ कल्पनाशीलतेचा (इमॅजिणेशन) अभाव असेल तर फक्त कोऱ्या ज्ञानाच्या जीवावर तुम्ही काहीच मिळवू शकणार नाही. शास्त्रज्ञ आइन्स्टिन कल्पनाशीलतेला ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे मानत होते. ते प्रायोगिकरित्या काहीही सिद्ध करण्याअगोदर ते पहिल्यांदा कागदावर उतरवून काढत. अशा प्रकारे शास्त्रज्ञ एडिसन यांनी विद्युत बल्ब जगासमोर आणण्यापुर्वी त्याचे कच्चे रेखाटन आपल्या वहीत रेखाटले होते. ते अजिबात 'हवेत गोळ्या मारत' नव्हते. त्यांनी पहिल्यांदा मनातल्या मनात कल्पना केली होती की, विद्युत बल्ब कसा दिसायला हवा. यानंतरच त्यांनी आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायला सुरुवात केली. 

वास्तविक एखादी व्यक्ती यश मिळवण्याच्या दिशेने काम करायला लागते, तेव्हा सगळ्यात अगोदर त्यांचं अंतिम कच्चं चित्र त्याच्या डोक्यात तयार व्हायला हवं. ज्या चांगल्या प्रकारे यशाचं चित्र डोक्यात तयार होईल, तितक्या लवकर तुमच्या यशाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल. जर तुम्ही आपल्या डोक्यात यश आणि त्याच्या संभावित मार्गाचे चित्र बनवले नसेल तर तुम्ही फक्त भरकटत जाल आणि अंतिमतः तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. तुम्ही म्हणाल, मन ज्याचा विचार करतं, तसं होणं शक्य नाही. पण हेही खरं आहे की, कित्येकदा आपण आपल्या विचारांच्या मागे जायला लागतो, तसतसे यश मिळायला लागते. यामुळेच जगातले बहुतांश सक्सेस गुरू तुम्हाला 'पॉजिटीव्ह थिंकिंग'चा (सकारात्मक राहण्याचा)  सल्ला देतात. 

पॉजिटीव्ह विचार केल्याने तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गाचा विचार करता,अडथळ्यांचा नाही. ज्यावेळी तुम्ही मनात यशोशिखरावर पोहचण्याचे प्लानिंग करता ,त्यावेळी त्या दिशेने वाटचाल करणं सोपं जातं. यासाठी तुम्हाला नॉलेजही हवं. तुम्ही तुमच्या नॉलेजसोबत अंतर्मनाच्या प्रेरणेशी जोडले जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये एक शक्ती असल्याची जाणीव होते आणि तुम्ही तुमच्या यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करू लागता. या दरम्यान तुम्हाला अनेक अडचणी येतात, पण तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर समस्यांची सोडवणूक करता. गोष्ट मग अभ्यासाची असेल किंवा नोकरीची!  अथवा पैसे कमावण्याची! प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मन आणि डोकं या दोघांचंही ऐका आणि  मगच तुम्ही संतुलित निर्णय घ्या. 

डोकं नॉलेजच्या गोष्टी करेल आणि मन इमॅजिनेशनच्या! आता कशाप्रकारे दोन्ही गोष्टी समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायचा,हे  तुमच्यावर अवलंबून आहे.निर्णय घेताना तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. जी माणसं या जगात यशस्वी झाली आहेत, ती माणसंही तुमच्यासारखीच सर्वसामान्य होती. पण त्यांनी यशाच्या अगोदरच यशाच्या बाबतीत चिंतन केलं होतं.त्यामुळेच ते यशस्वी झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment