Wednesday, February 22, 2023

आयुष्यात पुढे जायचे असेल तर चांगल्या लोकांचा सहवास ठेवा


तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संगतीचा विचार करावा लागेल. एखाद्या व्यक्तीचे विचार आणि वर्तन मुख्यत्वे अशा लोकांवर अवलंबून असते, ज्यांच्यासोबत ते आपला अधिक वेळ घालवतात. जर तुम्ही अशा लोकांसोबत राहत असाल ज्यांना सर्वत्र नकारात्मकता दिसते किंवा ज्यांची विचारसरणी खूपच छोटी आहे, आणि जे मोठे स्वप्न पाहण्यास घाबरतात, अशा लोकांच्या सानिध्याने तुम्ही कधीच तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही.  कारण संगतीच्या विचारसरणीचा तुमच्या विचारांवरही परिणाम होतो. म्हणूनच शक्य तितक्या लवकर नकारात्मक विचारधारा असलेल्या लोकांची सांगत  सोडा आणि सकारात्मक विचारांच्या लोकांशी मैत्री करायला सुरुवात करा.

त्याचप्रमाणे, तुम्हाला तुमच्या सवयी आणि वागणे याकडेही बारकाईने पाहा. तुमचा सर्वाधिक वेळ कोणत्या गोष्टींसाठी जातो आणि त्याचा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी उपयोग होतो का ते पहा. तुमच्या दिवसाचा मोठा भाग हकनाक वाया जात असेल तर त्याबाबत चिंतन करा. आणि यानंतर हळूहळू या सवयी आणि वर्तन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा. सतत प्रयत्न केल्याने तुमच्या या सवयी हळूहळू संपुष्टात येतील आणि तुमच्या यशाचा ग्राफदेखील अनेक पटींनी वाढेल. याशिवाय कोणतेही काम पुढे ढकलले जाऊ नये, ज्या त्या वेळी जे ते काम झाले पाहिजे, याकडे कटाक्ष ठेवा. वेळ वाया घालवून चालणार नाही, याची कल्पना आपणा सर्वांना आहे. आजचे काम आजच करा, ते उद्यावर टाकू नका. कामाची टाळाटाळ करून तुम्ही स्वतःची फसवणूक करता, जेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्हाला आज नाही तर उद्या ते काम करावेच लागणार आहे. तर ते उद्यावर टाकणे थांबवा. नंतर कामाचे ओझे वाढले की मानसिक परिस्थितीदेखील बदलते. विनाकारण ताण यायला लागतो. हे टाळण्यासाठी वेळच्या वेळी काम करत चला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment