Sunday, May 28, 2023

( प्रेरक प्रसंग) जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सांगितले वेळेचे महत्त्व


अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे अत्यंत वक्तशीर होते. वेळेचे पक्के होते. त्याची सर्व कामे वेळेवर होत.ते ठरलेल्या वेळेला उठायचे. ते ठरलेल्या वेळेत नाश्ता करायचे आणि ठरलेल्या वेळेला आपल्या कामाला सुरुवात करायचे. एकदा त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या काही नवीन सदस्यांना भोजनासाठी आमंत्रित केले आणि बरोबर रात्री आठ वाजता पोहोचावे असा निरोप दिला. खरे तर ते रोज रात्री आठ वाजताच जेवायला बसायचे, पण जॉर्जसाठी वेळ किती महत्त्वाची आहे हे नवीन सदस्यांना माहीत नव्हते. त्यांनी या बाजूकडे लक्षच दिले नाही.त्यांना पोहोचायला थोडा वेळ झाला. इकडे आठ वाजता जॉर्ज यांचे ताट करण्यात आले आणि जॉर्ज यांच्या पुढ्यात ठेवण्यात आले. त्यांनी लगेच जेवायला सुरुवात केली. त्यांचे अर्धे जेवण झाले होते, अमेरिकन काँग्रेसचे नवे सदस्य तिथे पोहोचले. जॉर्जना जेवताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले.पाहुणे येण्याआधीच यजमान जेवायला बसल्याचे ते पहिल्यांदाच पाहत होते.जॉर्ज यांचे विचित्र आदरातिथ्य पाहून  ते गोंधळून गेले. सदस्यांनी याबाबत विचारले असता जॉर्ज म्हणाले, 'मी जेवायला बसलो याचे तुम्हाला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही.' निमंत्रित पाहुणे आले आहेत की नाही हे माझा स्वयंपाकी कधीच पाहत नाही. तो जेवण आठ वाजता लावतो.त्याने ताट लावले की मी लगेच जेवायला सुरू करतो. आजही त्याने तेच केले. अशा प्रकारे मी प्रत्येक गोष्ट वेळेवर करतो. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.' एवढं बोलून जॉर्ज वॉशिंग्टन जेवणात मग्न झाले. पाहुणे शरमिंदे झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

प्रेरणा- आयुष्य घडवण्यासाठी नेहमी वेळेचा सदुपयोग करा.


No comments:

Post a Comment