जगातील प्रसिद्ध अब्जाधीश आणि मोठ्या औद्योगिक समूहाचे अध्यक्ष एक गृहस्थ आपल्या साधेपणा आणि काटकसरीसाठी ओळखले जात. त्यांची साधी जीवनशैली बघून असे वाटत नाही की ते एवढ्या मोठ्या मालमत्तेचा मालक आहेत आणि त्यांचा उद्योगक्षेत्रात किती मोठा प्रभाव आहे. त्यांच्या साधेपणाचे उदाहरण लोक नेहमीच देत असत. मात्र त्यांच्या जीवनशैलीच्या अगदी उलट, त्यांची तीन मुले वागत. श्रीमंतीत मनसोक्तपणे जगत असत आणि उदंडपणे खर्च करत असत. याचीही चर्चा होत असे. हा विरोधाभास पाहून शेवटी त्यांच्या एका गृहस्थाला राहवले नाही. 'साहेब, आज माझ्या मनात एक प्रश्न आला आहे, ज्याचे उत्तर मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे. अशी काटकसरी जीवनशैली अंगीकारून तुम्ही जगता हे पाहून आश्चर्य वाटते. पण मला पडलेला प्रश्न हा नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की तुमची मुलं दोन्ही हातांनी वारेमाप संपत्ती खर्च करतात आणि चैनीचे जीवन जगतात. हे असं कसं? तुमच्यात आणि तुमच्या मुलांच्या जीवनशैलीमध्ये इतके अंतर का?'
प्रश्न ऐकून उद्योगपती क्षणभर थांबले आणि मग हसत म्हणाले, 'माझ्या मित्रा, याचं उत्तर अगदी साधं सरळ आहे. मी एका गरीब मजुराचा मुलगा आहे. आणि ती तिघंही एका श्रीमंत उद्योगपती बापाची मुलं आहेत. आता माझ्यात आणि त्यांच्यात हा फरक असणार, हे स्वाभाविक आहे.' अतिशय साधेपणाने दिलेले हे लाजवाब उत्तर ऐकून ते गृहस्थ निरुत्तर झाले.

No comments:
Post a Comment