जे व्यक्तिमत्त्व दुसऱ्याला खऱ्या अर्थानं प्रभावित करतं, त्यानं पहिल्यांदा स्वतःला प्रभावित करण्याचा सराव केलेला असतो. हा सराव अशा सवयींचा आहे, जी आपली मानव होण्याची निशाणी आहे. या सवयीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते, म्हणजे यशस्वी आणि श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या काही खास सवयींवर काम करावं लागेल. कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच्या मूळ स्वभावामुळे होते.
म्हणजे तो आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांशी कसा वागतो, व्यवहार करतो, त्यांना कसे जाणून घेतो. प्रभावशाली व्यक्तित्वासाठी काही खास सवयी असणं गरजेचं आहे. आणि या सवयींचा अंगीकार केल्यास तुम्ही प्रभावशाली व्यक्ती बनू शकता.
आभार व्यक्त करायला शिका
प्रभावशाली व्यक्तित्वाची विशेष सवय आहे ती म्हणजे आभार प्रकट करणे. आयुष्यात असे प्रसंग रोज येत असतात. रोज कोणाची ना कोणाची आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत मिळत असते. काम लहान असो किंवा मोठे, आपल्यासाठी कोणी काही केले तर त्याचे अगदी मनापासून आभार माना. त्याला धन्यवाद द्या. त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. जितका याचा सराव कराल, त्याचा तुम्हाला फायदाच होईल.
आपलं आयुष्य सहज-सोपे असावे
तुमचे यश लोकांना प्रभावित करत असते. पण तुमचा साधा सरळ स्वभाव त्यांच्या हृदयात वसतो. तुमच्यावर ते 'फिदा' होतात. आज आपण आपल्या पेहरावाबाबत खूपच जागृत असतो. पण पेहरावापेक्षा चांगल्या सवयी आपल्याला इतर माणसांशी लवकर जोडतात. सहज साधा स्वभाव लोकांना आकर्षित करतो.
योग्य-अयोग्य दृष्टीकोन बाजूला ठेवा
एका सर्व्हेक्षणानुसार बहुतांश लोक आपले विचार शेअर करत नाहीत, कारण त्यांना आपले विचार इतरांना चुकीचे वाटतील की काय, याची भीती वाटत असते. मात्र ही सवय आपल्याला इतरांपासून दूर नेत असते. खरे तर आपण जसे आहोत, तसेच राहण्याचा प्रयत्न करा. योग्य अथवा अयोग्य या भानगडीत पडूच नका. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. दुसरे आपल्याबाबतीत काय विचार करतील, याच्या भानगडीत पडू नका.
बोलण्याअगोदर जरूर ऐका
चांगला वक्ता होण्यासाठी अगोदर चांगला श्रोता होणं आवश्यक असतं. अनेकांची तक्रार असते की, त्यांचं कोणी ऐकून घेत नाही, समजून घेत नाही. याचा अर्थ चांगल्या श्रोत्याचा सगळीकडेच अभाव आहे. समोरच्याला ऐकून घ्या, त्याच्या विचारांचा सन्मान करा.
प्रेरणा आणि उत्साहाचे माध्यम बना
जेव्हा कुणी आपल्याशी त्याचे स्वप्न, विचार, योजना शेअर करतील, तेव्हा मोठ्या उत्साहाने आणि लक्षपूर्वक त्याचे ऐका. गरज असेल तर त्याला सूचना, उपाय सांगा. त्याला प्रेरित करा आणि योग्य मार्गदर्शन करा. त्याच्यात आत्मविश्वास येईल, असे मार्गदर्शन व्हायला हवे. तुम्हाला वाटलं की काही सुधारणा कराव्या लागतील तर त्याला सांगा, त्याच्या चांगल्या गोष्टी, गुण याचे कौतुक करा. आणि शेवटी हेही सांगा की 'मला विश्वास आहे, हे तू करशील.'
विनम्र राहा
आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा एखाद्या माणसाचे नाव सांगा, जो स्वभावाने उग्र (तापट, रागीट)आहे आणि सगळे त्याला पसंद करतात. असा प्रकार अशक्यच आहे. विनम्रता आपल्या अंगी अशा प्रकारे भिनली पाहिजे की समोरचा आपल्यावर रागाराग करतो आहे आणि त्याला तुम्ही तितकेच शांत राहून समजावून सांगत आहात. समोरच्या माणसाचा रागराग करू नका. त्याची चूक झाली असली तरी त्याच्याशी सहजपणे बोला आणि समजावून सांगा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012

No comments:
Post a Comment