Friday, August 11, 2023

फौजदार व्हायचंय ? तर असा करा अभ्यास!

पोलिस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरले जाते. ही परीक्षा घेण्यासाठी संविधानानुसार स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे अत्यंत पारदर्शक स्वरूपात परीक्षा घेतली जाते. जर विद्यार्थ्याचे ध्येय निश्चित असेल, प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते. दरवर्षी लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होते. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी व दुय्यम निबंधक अशी विविध पदे भरली जातात. 

परीक्षेचे स्वरूप: ही परीक्षा वस्तुतिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून चार टप्प्यामध्ये घेतली जाते.

 १) पूर्व परीक्षा - १०० गुण 

२) मुख्य परीक्षा - ४०० गुण 

३) शारीरिक चाचणी - ७० गुण (गुणात्मक स्वरूप) 

४) मुलाखत - ४० गुण 

शैक्षणिक, शारीरिक पात्रता पीएसआय- पदासाठी सर्वसाधारण कोणत्याही विषयात पदवी धारण केलेला उमेदवार अर्ज करू शकतो.  पुरुष उमेदवारांसाठी १६५ से.मी. उंची व महिलांसाठी १५७ से.मी. उंची आवश्यक आहे. 

1.पूर्व परीक्षा - पूर्व परीक्षा चाळणी स्वरूपाची असते, त्यामध्ये 100 प्रश्न हे १०० गुणांसाठी असतात. या परीक्षेसाठी साधारणत: २ ते 3 लाख विद्यार्थी अर्ज करतात. यातून चाळणी करून (एकूण जागा x १२) हे प्रमाण लक्षात घेऊन एक कट ऑफ रेषा आखली जाते व त्या रेषेवरील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र केले जाते, पूर्व परीक्षेला 100 प्रश्‍न येतात व यासाठी वेळ असतो केवळ एक तास यामुळे परीक्षा देते वेळी अचूकतेबरोबर वेळेत प्रश्‍न सोडवणे महत्त्वाचे असते. पूर्वपरीक्षेनंतर जवळपास ४ महिन्यांत मुख्य परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम - राज्यशास्त्र - १५ प्रश्‍न, अर्थशास्त्र - 15 प्रश्न, चालू घडामोडी - १५ प्रश्न, सामात्य विज्ञान - 15 प्रश्न, इतिहास - १० प्रश्‍न, भूगोल - १० प्रश्न, गणित व बुद्धिमत्ता - २० प्रश्‍न 

2 मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षासुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. त्यामध्ये २ पेपर असतात व प्रत्येक पेपरसाठी वेळ 1 तास असतो.  पेपर क्रमांक १- यामध्ये २०० गुणांसाठी मराठी व्याकरणावर ५० प्रश्‍न व इंग्रजी व्याकरणावर ५० असे १०० प्रश्‍न असतात.  पेपर क्रमांक २ - या पेपरमध्ये जवळपास ७० टक्‍के अभ्यासक्रम हा पूर्वपरीक्षेचाच असतो फक्त पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्‍क अधिनियम व सुदूर संवेदन हे विषय नव्याने समाविष्ट असतात जे आपण मुख्य परीक्षेच्या काळात वाचू शकतो. या पेपरमध्ये १०० प्रश्‍न आणि २०० गुण असतात, 

3.शारीरिक चाचणी : मुख्य परीक्षानंतर साधारणत २ महिन्यांमध्ये निकाल लागतो व एका जागेसाठी ४ उमेदवार या प्रमाणात विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठी पात्र केले जातात. आयोगाने जाहीर केलेल्या निकषातुसार २०२३ पासून शारीरिक चाचणी ही केवळ गुणात्मक स्वरूपाची केली आहे. १०० पैकी केवळ ७० मार्क्स घेणे आवश्यक आहे व हे गुण अंतिम गुणवत्ता यादीत गृहीत धरले जात नाहीत. शारीरिक चाचणीचा सराव शक्यतो एखाद्या कोचच्या मार्गदनाखाली करावा, सराव करताना आपण काळजीपूर्वक तसेच सातत्याने केला पाहिजे, पुरुषांकरिता निकष - ८०० मीटर धावणे, गोळा फेक , लांब उडी , पुलअप्स महिलांकरिता निकष- २०० मी धावणे, गोळा फेक, तीन कि.मी. चालणे 

4. मुलाखत - परीक्षेचा हा शेवटचा व निर्णायक टप्पा असतो. मुलाखतीसाठी ४० गुण असतात. या टप्प्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपण कसे बोलतो? विविध विषयांवर आपली काय मते आहेत? सामाजिक प्रश्‍नांची जाण यासह व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तपासले जातात व त्यानुसार गुण दिले जातात. 

5. अंतिम निकाल- मुलाखत झाल्यानंतर लगेचच अंतिम निकाल जाहीर केला जातो. अंतिम निकाल हा मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यावरील गुणाची एकत्रित बेरीज करून तयार केला जातो.


No comments:

Post a Comment