Tuesday, August 8, 2023

वक्तृत्व एक कला...

आपल्या संभाषण कौशल्यात जर बदल आणायचा असेल तर तुमच्या सर्वात आवडत्या वक्त्याचे नाव आठवा. ज्या वक्त्याचे ऐकल्यानंतर आपल्याला त्याने मांडलेला मुद्दा लगेच समजतो. त्याच्या भाषाशैलीची, शब्दांची आपल्याला एक आगळीच ओढ असते. त्याची देहबोली, त्याचा पेहराव, एकंदरीत त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचादेखील आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असल्याचे आपल्या लक्षात येईल. आपल्यालासुद्धा त्याच्यासारखे उत्तमपणे बोलता यावे हीच आपली एक माफक अपेक्षा असते. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील वक्त्यांच्या भाषाशैलीत संस्कृत सुभाषितांचा उल्लेख असायचा म्हणूनच त्या काळात पाठांतरालासुद्धा तितकेच महत्त्व होते, पण जसजसे जग बदलत गेले त्या पद्धतीने सहज आणि ओघवते बोललेले लोकांना आवडू लागले. 

उत्तम वक्‍ता होण्यासाठी जागतिक वक्‍त्यांचा केलेला अभ्यास खूप कामी येतो. प्रसिद्ध व्यक्तींची आत्मचरित्र वाचणे, इंटरनेट वरील व्हिडीओ पाहणे गरजेचे आहे. 

जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार मांडण्याची पद्धती यांची सुसंगती आपल्याला घालता येईल. एखादा ठळक मुद्दा जर तुम्हाला प्रकर्षाने मांडायचाच असेल तर त्यासोबतच त्या विषयाशी निगडित असणारे अवांतर ज्ञानसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. म्हणून वाचनाला वक्‍तृत्वात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निर्भयपणे, आकाराने लहान लहान वाक्‍यांतून अगदी समर्पकपणेदेखील आपले मुद्दे मांडता येतात. जाणकार वक्‍ते श्रोत्यांना ज्या भाषेत समजेल त्या माध्यमांतून अर्थात कधी व्याख्याने देऊन, कधी आध्यात्मिक भजन कीर्तनांतून, तर कधी विनोदी शैलीनेदेखील आपला मुद्दा मांडतात. अनेक क्रांतिकारक आणि समाजसुधारक हे उत्तम वक्‍ते होते आणि या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाची स्वत:ची अशी आगळीवेगळी एक शैली होती. त्यापैकी काही नावे म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी. मराठी साहित्यातदेखील पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, आचार्य अत्रे या सर्वांच्या मांडणीतला वेगळेपणा आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. नुसतं अनुसरण न करता आपलं वेगळेपण जपत श्रोत्यांसमोर आपली प्रतिमा निर्माण करू शकता. 

सर्वसाधारण जनतेचे प्रश्‍न जाणून घेताना त्यांच्याशी संवाद करताना साध्या भाषेत संवाद साधायचे आणि विद्वान लोकांशी चर्चा करत असताना ते आपल्या विद्वतेने समोरच्याला आपला मुद्दा पटवून द्यायचे कौशल्य एका सर्वोत्तम वक्त्याला चांगलेच अवगत असते. विषयास अनुसरून देहबोलीचा वापर करून मुद्दा मांडता यायला पाहिजे. काहींना आपला मुद्दा प्रश्‍न विचारून मांडायला आवडतो. ज्यामुळे मुद्दा एकतर्फी भाषण न राहता एकमेकांशी केलेला संवाद वाटू लागतो. 

No comments:

Post a Comment